जळगावातील पहाटेची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी एका तरूणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार सुऱ्यासारख्या शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशनबाहेरील हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर आधार सोनवणे (रा. रोहनवाडी, कानळदा रोड) हा तरूण बुधवारी २६ जून रोजी पहाटे ३ वाजता जळगाव रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदीराच्या मोकळ्या जागेवर बसलेला होता. त्यावेळी अक्षय अटवाल (रा. शनीपेठ, जळगाव) मंदीराजवळ सिगारेट ओढत होते. त्यावेळी ज्ञानेश्वरने मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्या अक्षयला हटकवले. या रागातून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर त्यांचा वाद वाढतच गेल्याने अक्षय अटवाल याने त्याच्या मित्रांना फोन लावून बोलावून घेतले. दरम्यान, काही वेळातच तीन अनोळखी इसम त्याठिकाणी आल्यानंतर अक्षय याने पुन्हा ज्ञानेश्वर सोनवणे सोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
मित्र आल्यानंतर अक्षय अटवाल याने त्याच्या कमरेला लावलेल्या सुऱ्याने ज्ञानेश्वर सोनवणे याच्या मांड्यांवर आणि हनुवटीवर वार करुन गंभीर जखमी केले. त्यात ज्ञानेश्वर याने प्रतिकार करण्यासाठी तो सुरा हातात पकडला असता, त्याच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी बुधवारी २६ जून रोजी सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.