जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी दोन संशयित आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे.
हेमेंद्र राजेंद्र शर्मा (वय ५६ वर्ष, रा. जय नगर, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवण्यासाठी त्यांना माहिती हवी असल्याने त्यांनी फेसबुकवर राम इन्व्हेस्टमेंट अकॅडमी नावाने जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या लिंकवर त्यांनी क्लिक केले असता त्यांना एका व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करण्यात आले.(केसीएन)त्या ग्रुप वर गुरुराम आणि दिया नावाच्या एडमिनने एक लिंक पाठवली. लिंक वर गेल्यावर शेअर मार्केट संबंधित क्लास घेण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच फिर्यादींना संशयित आरोपी यांनी विविध प्रलोभन दिले होते.
त्यानुसार दि. ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत अनोळखी इसमाने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर्स खरेदी विक्रीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूशनल अकाउंट तयार करण्यास सांगून फिर्यादीला विविध कारणांसाठी आणि चार्जेस नावाखाली एकूण ५ लाख ९५ हजार ७५० रुपये विविध बँक खात्यावरून संशयित आरोपींनी घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे.(केसीएन)याबाबत सायबर पोलिस स्टेशनला दि. २७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एक पथक तयार केले होते.
या पथकाने दि. २४ जून ते दि. २५ जूनदरम्यान दिल्ली येथे जाऊन सीडीआरच्या माहितीवरून सापळा रचला. त्यानुसार दिल्लीच्या पटेल नगर भागातून रणजीत सिंग मदन कुमार (वय ४३, रा. जहांगीरपुरा, दिल्ली), प्रवीण कुमार बीरेंद्र शाही (वय ४४, रा. द्वारका सेक्टर-१९,दक्षिण दिल्ली) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंजाब नॅशनल बँकेच्या कागदपत्रात दिलेला व लिंक असलेला मोबाईल फोन, विविध बँकांचे एटीएम कार्ड असे ताब्यात घेण्यात आले आहे.(केसीएन)संशयित आरोपींना गुरुवार दि. २७ जून रोजी जळगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसंत बेलदार, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, नितीन भालेराव, प्रशांत साळी यांनी केली आहे.