६ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी):- पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाणेगाव येथे एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला विरोध करून जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ६ संशयितांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाणेगाव (ता. पाचोरा) येथील समाधान काशीनाथ सोनवणे (वय ४४) यांच्या आईचे १९ मार्च रोजी निधन झाले होते. दुपारी १ ते ४ वाजेच्या सुमारास सोनवणे कुटुंबीय आणि समाजबांधव मृतदेह घेऊन गावातील दफनभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेले होते.
यावेळी गावातीलच काही जणांनी “येथे दफनविधी करू देणार नाही” असे म्हणत अंत्यविधीला विरोध केला. इतकेच नव्हे तर फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी व धक्काबुक्की देखील करण्यात आली. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी समाधान सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भांडू वामन पाटील, योगेश वामन पाटील, ऋषीकेश संभाजी पाटील, मनोहर प्रभाकर पाटील, प्रभाकर रमेश पाटील, शुभम एकनाथ पाटील (सर्व रा. वाणेगाव, ता. पाचोरा) यांच्यावर गुन्हे दाखल झाला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पाचोरा उपविभागाचे एसडीपीओ बापू रोहोम आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.









