जामनेर तालुक्यात गंगापुरी येथे घटना
जामनेर (प्रतिनिधी) : भुसावळ येथील एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांच्या किमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली. ही घटना जामनेर तालुक्यातील गंगापुरी गावाजवळील पुलावर शनिवारी मध्यरात्री सुमारे पावणेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात सुमारे १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल दिगंबर सोनवणे (रा. शांतीनगर, भुसावळ) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. तक्रारीत चार संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यासह इतर दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते चारचाकी वाहनाने जामनेर येथे मित्राला भेटायला आले होते. रात्री दोनच्या सुमारास परत जात असताना गंगापुरी गावाजळील पुलाजवळ विसर्जनासाठी गर्दी झाली होती आणि दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. बंदोबस्तावर असलेले भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले असता मारहाण करणारे तरुण पसार झाले.
पुलाजवळ चारचाकी थांबविल्यावर एका मंडळातील काही मुलांनी कार मागे घेण्यास सांगितल्यावर त्यांनी वाहन मागे घेतले. त्याचवेळी मागून ८ ते १० मुले आरडाओरड करत कारजवळ आले. त्यावेळी सोनवणे यांनी काचखाली केल्यावर त्यांनी धक्काबुक्की केली. एकाने राहुल यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची साखळी हिसकावून घेतली. साईड ग्लास फोडून कारचे नुकसान केले. नादी लागू नका, अशी धमकीही दिली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.