भडगाव तालुक्यात वनविभागाने केले उपचार
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील भडगाव-एरंडोल रस्त्यावर भडगावनजीक रस्ता ओलांडताना वाहनधारकांना एका बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी पिल्लाला ताब्यात घेऊन प्रथमोपचार करून नाशिकला पाठविले आहे.
वनपाल नंदू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पिल्लाला प्रथमोपचार दिले. वेळीच मदत मिळाल्याने बिबट्याच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे. दरम्यान, वन्य प्राणी आता शहराकडे येऊ लागल्याने वनविभागाने प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. रात्री वन्यप्राणी फिरत असतात. म्हणून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांनी वाहने जपून चालवावी, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.