जळगाव (प्रतिनिधी ) ;- वाघूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जामनेर तालुक्यात वाघूर नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेतीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिवरी, हिवरखेडा दिगर या गावात वाघुर नदीचे पाणी शिरले आहे तर वाकोद तोंडापूर पुलापर्यंत नदीचे पाणी टेकलेले असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिवरी, हिवरखेडा दिगर गावात पाणी शिरल्यामुळे तीन ते चार घरे वाहून गेली आहे. पहूर पेठ गावात पाणी शिरले असून आठवडे बाजार परिसर पूर्णपणे पाण्याखाली आला आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे हे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. वाघुर नदीची परिस्थिती पाहता जिल्हाधिकार्यांनी एसडीआरएफ धुळे या आपत्ती व्यवस्थापनच्या टीमला पाचारण केले आहे.
प्रशासनातर्फे स्थानिकांनी नदीकाठी जावू नये, तसेच आपले पशूधनाला नदीकाठी जावू देऊ नका. आसपासच्या भागात पाण्याची पातळी आणखी वाढू शकते, (जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष 02572217193 ) अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.