धर्मादाय उपायुक्तांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : विविध सार्वजनिक उत्सव, उपक्रम व कार्यक्रम यांचेकरिता वर्गणी गोळा करायची असेल तर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवसाय अधिकलमनुसार सहाय्य्क/धर्मादाय उप आयुक्त, जळगाव यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. नजिकच्या काळात येणारे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेस उप आयुक्तांनी कळविले आहे.
आतापर्यंत याकरीता कार्यालयात समक्ष येवून विहीत फॉर्म व कागदपत्रे दाखल करणे आवश्यक होते. परंतु जनतेच्या सोयीकरीता ही सुविधा धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे. संबंधितांनी ऑनलाईन अर्ज व माहिती https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरणे आवश्यक आहे. त्याकरिता सदरील संकेतस्थळावर युझर आयडी व पासवर्ड तयार केल्यानंतर आवश्यक असलेली माहिती भरणे गरजेचे आहे. तसेच आवश्यक माहिती नमूद करीत असतांना खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे ही आवश्यक आहे.
सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव असावा. (हस्तलिखीत) (स्कॅनप्रत), पदाधिका-यांचे/सदस्यांचे ओळखपत्राची स्कॅन प्रत सोबत जोडावी. (फोटो आयडीची नविनतम प्रत/ओळख पटण्याजोगी असावी). जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत पत्र / परवानगीपत्र जोडावे (स्कॅनप्रत), नगरसेवक/प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे मंडळ सदस्याचे ओळखीबाबत पत्र जोडावे (स्कॅनप्रत), मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशोब जोडावे (लागू असल्यास) (स्कॅनप्रत), मागील वर्षी घेतलल्या परवानगी पत्राची प्रमाणीत प्रत (लागू असल्यास) (स्कॅन प्रत),याप्रमाणे परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त, जळगाव यांना योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, त्यास विहित शर्तीस अधिन ठेवून अशी वसूली (देणगी/वर्गणी गोळा करणे) चालू ठेवण्यास परवानगी देता येईल.
कोणीही न कळविता वर्गणी/देणगी गोळा केल्यास, त्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास व कायद्याचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, यांची सर्व मंडळ/सदस्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीकरीता सर्व मंडळांनी https://charity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावून माहिती घ्यावी. असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त, जळगाव यांनी केले आहे.