चाळीसगावातील व्यक्तीला सोलापूरला नेऊन डांबले; एकासह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- उसाच्या पैशांच्या व्यवहारातून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करत जबरदस्तीने बँकेच्या चेकबुकावरील चार चेकवर सह्या घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकासह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश मोरसिंग राठोड (वय ३८, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) यांच्याकडे उसाचे पैसे बाकी असल्याच्या कारणावरून संशयित स्वप्नील गोरख निटवे (रा. मोरोची, नातेपुते, जि. सोलापूर) व त्याच्या चार साथीदारांनी २५ जून रोजी दुपारी चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरात त्यांना अडवले.
संशयितांनी फिर्यादीच्या चेहऱ्यावर मिरची टाकून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने मारुती इको वाहनात बसवून अपहरण करण्यात आले. आरोपींनी फिर्यादीला सोलापूर जिल्ह्यातील मोरोची येथे एका घरात नेऊन डांबून ठेवले. तसेच हस्ती को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेकबुकातील चार चेकवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या आणि काही कागदपत्रांचे नोटरीकरणही करून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण, धमकी आणि इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









