मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय
बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरु उपोषणात पती-पत्नी सहभागी होते. तेथून अचानक उठून ते घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे उघडकीस आली. दरम्यान, त्यांनी मराठा आरक्षणासाठी तर आत्महत्या केली नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे सदर घटना उघडकीस आली आहे. राजु बंडू चव्हाण (वय ३१) आणि सोनाली राजु चव्हाण (वय २८) असे मयत दाम्पत्यांचे नाव आहे. आज सकाळपासून जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण सुरु आहे. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते. अचानक उपोषणातून उठले आणि उपोषण स्थळापासून काही अंतरावर असलेल्या घरी जावून बायकोसह गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी तलवाडा पोलीस अधिक तपास करत आहे.