जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कंपनीसमोर लावलेला ट्रक चालकाने सुरू करून काढल्याने त्या खाली झोपलेले ट्रकचे क्लिनर दीपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल) हे चिरडून ठार झाले. ही घटना बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
एमआयडीसीमधील एका कंपनीसमोर ट्रक उभा होता. त्याखाली त्याच ट्रकचे क्लिनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही व त्याने ट्रक सुरू करून जागेवरून काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यावेळी त्याने येऊन पाहिले असता ट्रक क्लिनरच चिरडल्या गेल्याचे दिसले. यात क्लिनरच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून हात-पायदेखील तुटले आहे.
आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेणुका भंगाळे यांनी त्याला मयत घोषित केले.
दरम्यान दीपक मेढे याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन प्रचंड आक्रोश केला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.