जळगाव एलसीबीची एरंडोल तालुक्यात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यात ट्रकमधून सबमर्सिबल मोटारपंप आणि सोलर पंप चोरी करणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांच्या चोरीचा छडा लागला असून, तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये दि. ३१ मे २०२५ रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. उमरदे गावाजवळ रोडवर एका ट्रकमधून २,३५,००० रुपये किमतीचे सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरीला गेले होते.(केसीएन)या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोहेकॉ संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, राहुल कोळी आणि दीपक चौधरी यांचा समावेश होता. या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान, आकाश लालचंद मोरे (वय २३, रा. मुगपाठ, एरंडोल) याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. २५ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी आकाश मोरे याला नागदुली गावाजवळील पदमालय फाटा येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान, त्याने भरत बाबुराव बागुल आणि पृथ्वीराज रतीलाल पाटील यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आकाश लालचंद मोरे (वय २३, रा. मुगपाठ, एरंडोल), भरत बाबुराव बागुल (वय ३२, रा. केवडीपुरा, एरंडोल), पृथ्वीराज रतीलाल पाटील (वय २०, रा. वरखेडी, एरंडोल) या तिन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आले आहे.(केसीएन)स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, हे.कॉ. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोकॉ राहुल कोळी, दिपक चौधरी यांच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.