महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने दिला ईशारा
जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य असल्याने महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या कामगारांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात सोमवारपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत नुकतीच महासंघाने द्वारसभा घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
मागील आंदोलनावेळी महावितरण प्रशासनाने कामगार महासंघाला दिलेले आश्वासन पाळले गेलेले नाही. त्यामुळे महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ यांच्या मार्गदर्शनात नुकतीच द्वारसभा घेण्यात आली. प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र या परिपत्रकाला महावितरण जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या १५ कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या नियमबाह्य करण्यात आलेल्या आहेत.
मुख्य अभियंता यांनी नेमलेल्या चौकशी समितीला दिलेली मुदत देखील संपली असून व धरणे आंदोलन स्थगित करुन जवळपास २ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. तरी देखील सुधारीत बदली प्रक्रिया संबंधी विभागीय कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही. संघटनेने दिलेल्या नोटीशीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्याच बरोबर नोटीशीच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. मुजोर व आडमुठे धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत असुन संघटनेला नाईलाजास्तव आंदोलनात्मक भुमिका घेण्यास प्रशासन भाग पाडत आहे, अशी माहिती द्वारसभेत देण्यात आली.
तसेच, १२ सप्टेंबरपासून सुरु असलेले धरणे आंदोलन आता साखळी उपोषणात परावर्तित केले जाणार आहे. महावितरण प्रशासनाला साखळी उपोषण करणार असल्याबाबत कामगार महासंघातर्फे कळविण्यात आले आहे. त्यानुसार नियमबाह्य बदल्या रद्द न केल्यास सोमवारपासून साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे. सोमवारी पहिल्या दिवशी महामंत्री सुभाष भावसार, प्रदेश कार्यसमिती सदस्य सुरेश सोनार, सर्कल सचिव ज्ञानेश्वर पाटील हे साखळी उपोषणाला बसणार आहे.