जळगाव शहरातील बाहेती विद्यालयाजवळची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – धूलिवंदनांच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला. यातून चौघांनी तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शनिवारी दि. १५ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास बाहेती महाविद्यालयासमोर ही घटना घडली.

प्रथम विजय लोंढे (वय १७, रा. कंजरवाडा) असे जखमीचे नाव असून, त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी १४ मार्च रोजी धूलिवंदनाच्या कार्यक्रमात प्रथम लोंढे हा नाचत होता. त्याचा धक्का एकाला लागला. धक्का लावल्याचे मनात ठेवत दाद्या उर्फ दादू, त्याचा भाऊ आणि त्याच्या सोबतचे दोन साथीदार यांनी शनिवारी दुपारी प्रथम याला महाविद्यालयाजवळील रस्त्यावर गाठले.
संशयितांनी प्रथम याच्या पाठीवर, डाव्या हाताच्या बोटावर व उजव्या मांडीवर चाकूने वार करीत त्यास घायाळ केले. शिवीगाळ करत बघून घेईल, असा दम भरला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान पोलिसांना जखमी तरुणाने दिलेल्या जबाबानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयितावर, रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक उल्हास च-हाटे तपास करीत आहेत.









