जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील सिद्धिविनायक कॉलनीत एका तरुण विवाहितेने पंख्याला गळफास लावून सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी आत्महत्या केली आहे. त्यांची मुले ट्युशनवरून घरी आली तेव्हा त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे कारण समजून आले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सीमा शशिकांत कासोट (वय ३३) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती शशिकांत कासोट व मुलासह राहतात. सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी पती शशिकांत हे शिक्षक असल्याने शाळेत गेले होते. तर मुलांना सीमा कासोट यांनी ट्युशनवर पाठविले. त्यामुळे सीमा कासोट या घरी एकट्याच होत्या. त्या वेळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतला. संध्याकाळी मुले क्लासमधून घरी आले तर घराचा दरवाजा आतून लावलेला होता.
मुलांनी बराच वेळ आवाज दिला तर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील लोकांना याबाबत कल्पना दिली. शेजारच्यांनी दरवाजा उघडला असता मुलांसह शेजारील मंडळींना सीमा या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. या विषयी विवाहितेचे पती व रामानंद नगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.