पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे चार दिवसांपूर्वी घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात एका व्यापाऱ्याने फरशी टाकून त्याला गंभीर जखमी केले होते. दरम्यान, तरुणावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला खुनाचे वाढीव कलम लावण्याचे काम सुरु होते.
जुबेर हनीफ पठाण (वय २७, रा. अंतुर्ली खुर्द, ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो अंतुर्ली येथे आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, २ मुलगी या कुटुंबासह राहत होता. हातमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचा भाऊ शाहरुख हनीफ पठाण (वय ३०) यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला दि. १३ रोजी फिर्याद दिली आहे. दि. १३ रोजी तो तारखेडा येथे मजुरीला गेला होता. तेथे मालाची गाडी रस्त्यातून बाजूला करण्याबाबत एका संशयित व्यापाऱ्याने जुबेर पठाण याला सांगितले. गाडीचा चालक बाहेर गेला आहे. आले कि सांगतो, असे जुबेरने व्यापाऱ्याला सांगितले.
याचा व्यापाऱ्याला राग आला. त्याने बाजूला पडलेली मोठी फरशी उचलून जुबेर पठाण याच्या डोक्यात हाणली. या जबर प्राणघातक हल्ल्यात जुबेर गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध झाला. त्याला आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तत्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने पाचोऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. नंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. उपचार सुरु असताना शुक्रवारी दि. १६ रोजी रात्री त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, जुबेर पठाण याच्या मृत्यूची माहिती मिळताच, त्याच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पाचोरा पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्याचे काम सुरु केल्याची माहिती मिळाली.