जळगावच्या तांबापुरा परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – काहीही कारण नसताना भंगार विक्रेत्यासह त्यांच्या मुलावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ३१ मार्च रोजी रात्री तांबापुरा परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्दाम शहा हुसेन शहा (वय ४२, रा. तांबापुरा) हे भंगार विक्रेते आहेत. त्यांच्या घरासमोर येऊन दोन जणांनी चाकूसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. शहा यांचा मुलगा साहील हा तेथे आला असता, त्याच्यावरदेखील एकाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी सद्दाम शहा यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार करीत आहेत.