शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागाच्या पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील ७१ वर्षीय वृद्ध रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागाकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल तीन वर्षापासून स्वादुपिंडाच्या गाठीच्या त्रासापासून त्यांना यामुळे मुक्तता मिळाली आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले आहे.
धोंडू आधार सोनवणे (वय ७१) हे धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे राहतात. त्यांना ३ वर्षापासून पोटात दुखणे आणि गाठ असल्यासारखे वाटत होते. त्यांना नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळेला शल्यचिकित्सा विभागातील वैद्यकीय पथकाने विविध तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, पोटात मोठी गाठ तयार झाली आहे. यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत आहे. शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे व युनिट ३ चे प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी धोंडू सोनवणे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर शस्त्रक्रिया करून स्वादुपिंडाची गाठ काढण्यात आली. यानंतर धोंडू सोनवणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वादुपिंडावर खान्देशात बहुदा पहिलीच शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात झाल्यामुळे शल्यचिकित्सा विभागाला मोठे यश मिळाले आहे. उपचार करण्याकामी डॉ. रोहन पाटील, डॉ. ईश्वरी भोंबे, डॉ. अभिषेक चौधरी, डॉ. जिया उल हक, डॉ. जैद पठाण, डॉ. अमेय नेहेते, डॉ. पूजा जयस्वाल यांच्यासह बधिरीकरण विभागातील डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अमित हिवरकर, डॉ. वैभव सोळंके व शस्त्रक्रियागृहातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रुग्णाला दिलासा दिल्याबद्दल वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले.
“खाजगी दवाखान्यात भरपूर पैसे सांगितल्यामुळे आम्ही शस्त्रक्रिया टाळत होतो. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत व उत्तम शस्त्रक्रिया झाल्यामुळे आनंद झाला आहे” अशी प्रतिक्रिया रुग्ण धोंडू सोनवणे यांनी दिली आहे.