जळगाव ( प्रतिनिधी ) – दोन महिनाभरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर संपास कारणीभूत असल्याचे सांगत जळगाव विभागाने पहिल्यांदाच कडक कारवाईत २२ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
४ नोव्हेंबरपासून राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने सुरु केलेल्या संपात या २२ कर्मचाऱ्यांची अग्रेसर भूमिका असल्याचे सांगत एसटी महामंडळाने कारवाई केली आहे. या २२ कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी जळगाव आगारात कार्यरत असून संघटनेने यापूर्वीच नोटीस मागे घेतल्यावरही ही कारवाई झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे.
अगोदर निलंबित केलेल्या या कर्मचाऱ्यांना अनेकदा बाजू मांडण्याची संधी देऊनही त्यांनी दुखवट्यात असल्याचे कारण सांगून प्रशासकीय चौकशीस नकार दिला होता. एसटी प्रशासनाने आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये अशी नोटीस त्यांना बजाविली होती मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.