नवी दिल्ली : देशात ज्या वेगाने कोरोना आपले हातपाय पसरतो आहे तो वेग तसाच राहिला तर १५ मे पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १३ लाखापर्यंत जाऊ शकते असा धक्कादायक अंदाज आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. कोव्ह-इंड-१९ या टीमने हा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. या टीममध्ये अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. त्यांनी दिलेला एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात त्यांनी ही धक्कादायक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारताने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीला चांगली आणि कठोर पावले उचलली. अमेरिका, इराण आणि इटली या देशांच्या तुलनेत भारताने उचलेली पावले निश्चितच चांगली आहेत. मात्र भारतातील कोरोनाग्रस्तांची नेमकी संख्या किती हे अद्याप नीट समजू शकलेले नाही. त्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते असेही या टीमने म्हटले आहे.
वैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार, भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. त्यांनी हेदेखील म्हटलं होतं की आपण लॉकडाउनचे नियम पाळले नाहीत तर आपला देश २१ वर्षे मागे जाईल.
भारतात एक हजार लोकांमागे एक आयसोलेशन बेड नाही ही देखील चिंतेची बाब आहे. भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच ताण आहे. त्यात आता कोरोनाचे संकट समोर आले आहे. फ्रान्स, दक्षिण कोरिया, चीन, इटली आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतात आयसोलेशन बेड्सची संख्या अगदीत नगण्य आहे. ही चिंतेची बाब आहे असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.