नवी दिल्ली: भारतातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी देशाची स्थिती विविध आघाड्यांवर खूपच दिलासादायक आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने 33 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील 25 टक्क्यांहून अधिक रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तर, करोना संसर्गामुळे देशात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण केवळ 3.2 टक्के इतके आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत करोना संकटातही देशात नोंदल्या गेलेल्या सकारात्मक बाबी मांडल्या. लॉकडाऊन लागू करण्याआधी देशात करोनाबाधितांची संख्या 3.4 दिवसांनी दुप्पट व्हायची. आता बाधित दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांपर्यंत वाढला आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू आणि पंजाबमध्ये बाधितांची संख्या दुप्पट होण्यास 11 ते 20 दिवसांचा कालावधी लागत असल्याचे आढळले. तर, केरळ, कर्नाटक, लडाख आणि उत्तराखंडमध्ये तब्बल 20 ते 40 दिवसांनी रुग्णांचे प्रमाण दुप्पट झाल्याचे स्पष्ट होते. देशातील रूग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण 14 दिवसांपूर्वी 13.06 टक्के होते. आता ते 25.19 टक्के इतके झाले आहे. देशात आतापर्यंत 8 हजार 300 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
देशात एका दिवसात 1 हजार 718 नव्या बाधितांची नोंद झाली. देशातील करोनाबळींची संख्या 1 हजारवर गेली आहे. मृतांमध्ये पुरूषांचे प्रमाण 65 टक्के तर महिलांचे प्रमाण 35 टक्के आहे. मृतांपैकी 14 टक्के 45 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सुमारे 35 टक्के मृत 45 ते 60 वर्षे वयोगटातील आहेत. करोनामुळे दगावलेल्यांमध्ये 51 टक्के रुग्ण 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते.