जळगाव – संगीत हे मनाला नेहमीच आनंद देते मात्र याच संगीताचा उपयोग रोगनिवारण्यासाठीदेखील करता येतो. आपल्या वेदांमधील सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. त्यानुसार रोग निवारण्यासाठी कोणतीही पॅथी असली तरी त्याला पुरक संगीतातील राग वापरले तर रुग्ण लवकर बरे होतात.. त्यासाठी आंतरराष्ट्रीय जनरल्समध्ये कोणत्या रोगासाठी कोणता राग ऐकावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे.. त्यानुसार एमबीबीएस प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी असलेल्या फाऊंडेशन कोर्सनुसार संगीत चिकित्सा पद्धतीवर आज २० फेब्रुवारी रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डीन हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन २०२१-२२ या वर्षात प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संगीत चिकित्सा पद्धती ह्याबाबत कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रो.डॉ.माया आर्विकर, डॉ.अमृत महाजन ह्यांची विशेष उपस्थीती होती.कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सॅनिटायझरसह मास्क लावत सुरक्षित अंतर राखून बसले होते.
याप्रसंगी आजारांचे नाव, त्याला अनुसरुन रागाचे प्रकार सांगत बंदिश आणि त्यावर आधारित चित्रपटाचे गीत डॉ.श्री.व सौ. आर्विकर दाम्पंत्य यांनी सादर केले, यावेळी अधिष्ठात डॉ.एन.एस.आर्विकर ह्यांच्या पेटी वादनाने कार्यक्रमाला चार चाँद लावले. यावेळी तीन मिनटात रागाची माहिती, तीन मिनीटात बंदिश आणि तीन मिनिटात चित्रपट गीत सादर करण्यात आले, यात राधा ना बोले ना बोले…., हमको मन की शक्ती देना…. आदि गीतांचे यावेळी सादरीकरण झाले.
औषधोपचाराबरोबर ही राग ठरतात पुरक
संगीत चिकित्सा पद्धतीनुसार विविध आजारांतून रुग्णाला बरे करण्यासाठी पूरक ठरणारे राग पुढीलप्रमाणे आहे. संधीवातासाठी राग यमन,
उच्च रक्तदाबाकरीता भीम पलास, कमी रक्तदाबासाठी मालकंस, औदासिन्यतेकरीता बागेश्री, निद्रानाशाकरीता बिहाग, डोकेदुखी-अर्धशिशीसाठी राग केदार, अपचन समस्येसाठी अहिर भैरव, दमा-खोकला श्वसन रोगासाठी तोडी अशा विविध आजारांसाठी विविध राग पुरक ठरतात.
फाऊंडेशन कोर्स म्हणजे काय ?
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय जनरल्सनुसार फाऊंडेशन कोर्स तयार करण्यात आला आहे, यात भाषा, संगणक ज्ञान, योगा, खेळ आणि संगीत चिकित्सा अशा पाच गोष्टींचा समावेश असून त्यानुसार औषधोपचाराबरोबर संगीत चिकित्सा पद्धती कशी महत्वाची याची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली.







