यावलच्या व्यावसायिकाची केली पवणेदोन लाखांची फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) : यावल येथील व्यावसायिकाने पॉलीसीच्या नावाखाली श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीच्या एजंटकडे कागदपत्रे दिली होती. मात्र त्या कागदपत्रांद्वारे व्यावसायीक यांना जळगावतील मोेमीन शेख तोसिफ शेख कामील याला जामीनदार म्हणून लावले. त्यानंतर व्यावसायीकाच्या खात्यातून मोमीन शेख याच्या जामीनाचे पैसे कपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दि. २४ रोजी रामानंद नगर पोलीसात श्रीराम चिट्स फंड कंपनीतील मॅनेजर विवेक बिरे यांच्यास एजंट मुकेश पाटील यांच्याविरुद्ध १ लाख ७४ हजार रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील मेडीकल व्यावसायीक प्रशांत अशोक कासार (वय ४५, रा. मेन रोड यावल) यांची त्यांचा गावातील मित्राच्या माध्यमातून श्रीराम लाईफ इन्शोरन्स कंपनीचे एजंट मुकेश पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर दि. ३१ मार्च २०२३ रोजी व दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी लाईफ पॉलीसीकरीता कासार यांनी एजंट मुकेश पाटील यांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आधारकार्ड, पॅनकार्ड व आयटी रिटर्नसह इतर कागदपत्रे स्वाक्षरी करुन दिले होते. त्यानंतर मुकेश पाटील यांच्याकडून श्रीराम चिटफंट (भिशी) कडून दि. १९ एप्रिल रोजी १५ लाख व दि. २१ फेब्रुवारी रोजी ५ लाख अशा दोन चिटफंड करीता त्यांनी पुन्हा सर्व कागदपत्रे दिले होते. श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीची दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रशांत कासार यांना नोटीस मिळाली. त्यामध्ये मोमीन शेख तौसिफ शेख कामील याला याला चिटफंड (भिशी) करीता जामीनदार केले असून त्याने पैसे न भरल्यामुळे त्यांना श्रीराम फायनान्स यांना पैसे भरावे लागतील असे समजले.
ज्या मोमीन शेख याला आपण ओळखत नाही, कधीही भेटलेलो नाही त्याला जामीनदार राहिलेलो नाही. त्यामुळे कासार हे शहरातील ओंकारेश्र्वर मंदिराजवळील श्रीराम चिट्स फंडच्या ऑफिसमध्ये जावून त्यांनी मॅनेजर विवेक बिरे यांना भेटले. मात्र त्यांनी तुम्ही मोमीन शेखला जामीनदार आहात, तुम्हाला पैसे भरावे लागतील असे सांगितले. जामीनदार राहण्यासाठी कधीही चिट्स फंडच्या कार्यालयात गेलेलो नसतांना, तसेच आपली परवानगी नसतांना मॅनेजर बिरे यांनी कोणतीही पडताळणी न करता ओळखत नसलेल्या मोमीन शेख याला जामीनदार दाखविले. त्यानंतर दि. २९ मार्च रेाजी कासार यांच्या ५ लाख रुपयाच्या चिट्सफंडमधून मोमीन शेख याच्या जामीनाची १ लाख ७४ हजार १८ रुपयांची रक्कम कपात करुन उर्वरीत रक्कम कासार यांच्या खात्यात वर्ग केली.
जामीनदाराची परस्पर रक्कम कपात केल्यामुळे प्रशांत कासार यांनी दि. २३ मार्च रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी झाल्यानंतर दि. २४ एप्रिल रोजी त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार एजंटला विश्वासाने दिलेली कागदपत्रे मॅनेजरने परस्पर वापरुन मोमीन शेख याला जामीनदार केले. तसेच त्यांच्या खात्यातून १ लाख ७४ हजार रुपये कपात करुन त्यांनी फसवणुक केली. याप्रकरणी श्रीराम चिट्स फंड कंपनीचे मॅनेजर विवेक बिरे (रा. जळगाव), एजंट मुकेश पाटील (रा. रचना कॉलनी) यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.