जळगावातील समता नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील समतानगर भागातील वंजारी टेकडीवरील घरांना अचानक आग लागली. आगीत पार्टीशनचे तीन घरं जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तीन्ही घरांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने रहिवाश्यांचा संसारच उघड्यावर आला आहे. एकूण दोन लाखांपर्यंतचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.
समतानगर भागातील वंजारी टेकडीवर अनेक पार्टीशनचे घरं आहेत. याठिकाणी गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच घरं पार्टीशनची असल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही. नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. एका बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत तीन पार्टीशनची घरं व घरांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत रविंद्र चव्हाण, समाधान चव्हाण, धुडकु चव्हाण यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रामानंद नगर पोलिसांनी देखील माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली होती.