धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : नळाचे पाणी आले असताना व त्यासाठी पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा दुर्दैवी करून अंत झाल्याची घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
विजया राहुल पाटील (वय २४, रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती गावात पती, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होती. विजया पाटील यांचे पती राहुल हे सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नळाचे पाणी आले होते.
त्यावेळेला पाण्याची मोटार लावण्यासाठी गेलेली विवाहिता विजया पाटील यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी सदर विवाहितेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे.
यानंतर कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.