जळगाव तालुक्यातील जळके येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळके येथील शेतकरी महिला शेतात जात असताना गुरुवारी सकाळी दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाली होती. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोन दिवसांनी शनिवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
अनिता आनंद ब्राह्मणे (वय ३०, रा. जळके ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या पती आनंद, २ मुले, सासू यांच्यासह जळके गावात राहतात. पती आनंद यांच्यासह शेतीकामात मदत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दि. ८ रोजी सकाळी साडे आठ वाजता शेतात दुचाकीवरून जात होत्या. तेव्हा अपघात होऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत होती.