जळगावातील छ. शिवाजीनगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील तरुणाने तणावातून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल राजेंद्र निकम (वय ३८, रा. दालफड, छ. शिवाजीनगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. अनिल हे आई, वडील, पत्नी, १ मुलगा यांचेसह राहत होते. पेंटिंग काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, शुक्रवारी दि. २८ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते.
उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी बुधवारी दि. २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.