यावल तालुक्यात टेंभी शिवारात घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यात यावल शहरालगतच्या टेंभी शिवारात एका केळी व्यापाऱ्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात व्यापारी जखमी झाले आहेत. वनविभागाकडून नोंद घेण्यात आली नव्हती.
इरफान रशीद खान (वय ५२, रा. बाबानगर, यावल) हे जखमी झाले आहेत. टेंभी कुरण शिवारातील शेतात ते दुपारी साधारण १२.३० वाजता मोटरसायकलने जात होते. यावेळी अचानक शेताच्या दिशेने आलेल्या लांडग्याने त्यांच्यावर झडप घालत मोटरसायकलवर हल्ला केला. लांडग्याने थेट त्यांच्या छातीवर पंजा मारून जखमी केले. मात्र, प्रसंगावधान राखत इरफान खान बचावले. या घटनेनंतर लांडगा घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून घटनेची नोंद घेण्यात आलेली नाही.