जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – घर बंद असल्याची संधी चोरटे साधत असून शिवाजीनगर, हुडको भागात चोरट्यांनी एक लाख २२ हजारांची रोकड लांबवली. याप्रकरणी शनिवार, २२ जुलै रोजी रात्री शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी नगर हुडको परीसरात चालक चांद खान इमाम खान (५०) हे परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार,१६ जुलै रोजी ते अमरावती जिल्ह्यात एका गावी गेले होते. त्यावेळी १६ जुलै ते २०जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात एका लिफाफ्यामध्ये ठेवलेले १ लाख २२ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. खान हे घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय निकुंभ करीत आहेत.