जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, आठ वर्षांपूर्वी घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चारित्र्याचा संशयावरून पत्नी व मुलीला केटामाईन विषारी इंजेक्शन देवून त्यांचा खून करणाऱ्या सचिन गुमानसिंग जाधव याला सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सचिन जाधव हा पत्नी कविता आणि मुलगी रिनाक्षी यांच्यासह जळगाव शहरातील रिंगरोड येथील एका हॉस्पिटलमध्ये वास्तव्याला होते. आरोपी हा पत्नी कविता यांच्यावर नेहमी चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. दरम्यान दिनांक ५ मे २०१६ रोजीच्या मध्यरात्री त्याने पत्नी कविता आणि मुलगी रिनाक्षी हे दोघेजण गाढ झोपेत असतांना केटामाईन विषारी औषध इंजेक्शनद्वारे देऊन त्यांचा खून केला होता.(केसीएन)घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात तपास अधिकारी सुप्रिया देशमुख, पोलीस निरीक्षक शाम तडवलकर आणि पोलीस उपनिरीक्षक कुबेर चौरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये एकूण २४ जणांची साक्ष नोंदवण्यात आली.(केसीएन)फिर्यादी तुषार राजपूत, डॉक्टर पाठक आणि महिलेच्या माहेरचे नातेवाईका यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
त्यानुसार न्यायालयाने दोषी ठरवत संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याला आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोग्यता निलेश चौधरी यांनी काम पाहिले, त्यांना एडवोकेट हर्षल राजपूत, पैरवी अधिकारी चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.