शिरसोली (प्रतिनिधी) :- जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे अनिल नामदेव फुसे (वय ४२, रा. भामवीरजवळ, शिरसोली प्र. बो.) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फुसे कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला.
.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल फुसे हे आपल्या राहत्या घरातील पुढील खोलीत साडीच्या साहाय्याने पंख्याच्या हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी व मुले घरातील मागील खोलीत झोपलेली होती. सकाळी घरातील सदस्य उठल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना घटनेची माहिती देण्यात आली.


अनिल फुसे यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अनिल फुसे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. अनिल फुसे हे शिरसोली प्र. न. गावात कापड दुकानाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी व चार भावंडे असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार असलेल्या अनिल यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








