धुळे :- कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला झाला असून पिकअप व्हॅन आणि इको वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला . जखमींना धुळ्यातील हिरे माहाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची धडक झाली. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातल्या हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शिंदखेडा शहरातील रहिवासी असून ते कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी वारूळ पाष्टे गावाला गेले होते.
या भीषण अपघातात इको वाहनामध्ये बसलेले सुनील दंगल कोळी (कुवर ) वय 30, रा. परसामळ, तालुका शिंदखेडा, मंगलाबाई लोटन देसले (वय 59) रा. गांधी चौक, शिंदखेडा, विशाखा आप्पा माळी (महाजन) वय १३ ,रा. धानोरा ,तालुका शिंदखेडा, मयुरी पितांबर खैरनार( परदेशी) वय 28, रा. विजयनगर ,शिंदखेडा, जयेश गुलाब बोरसे, (वय 22), रा. वारूड , तालुका शिंदखेडा ,यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने या इको कार ला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाचा चालक हा मदधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळाल्याने नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले असून गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.