जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा येथे एका शेतमजुराने नैराश्यातून छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


आनंदा धर्मा पाटील (वय ४०, रा. कानळदा ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गावात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगी यांच्यासह राहत होते. शेतमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन) आनंदा पाटील हे गुरुवारी घरी वरच्या मजल्यावर एकटेच होते. त्यावेळी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने त्यांची आई वरच्या खोलीत आली तेव्हा घटना उघड झाली.
आईने शेजारी नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश करून शोक व्यक्त केला. शेत मजुराच्या मृत्यूमुळे कानळदा गावात शोककळा पसरली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









