जळगाव तालुक्यातील लमांजन येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लमांजन येथील एका शेतकऱ्याने शेतीसाठीचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कैलास भिवसन पाटील (वय ५० रा. लमांजन ता.जि.जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील लमांजन येथे कैलास पाटील हे पत्नी, मुलगा आणि सुन यांच्या सोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्जबाजारीमुळे विवंचनेत होते. त्यांच्यावर खासगी आणि सोसायटीचे कर्ज होते. या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान कुऱ्हळदे ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४०१ जवळ धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. ही बाबत लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायलट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशनचे मास्तरांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.