ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम ८ दिवसाच्या आत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळावी म्हणून मार्च महिन्यात तहसीलदार, कृषी अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत ही रक्कम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज मे महिन्याची २२ तारीख घेऊन ठेपली आहे. तरी ही पिक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले असून विम्याची रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत निबोळकर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. ही रक्कम आगामी ८ दिवसात न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
योग्य भाव मिळत नसल्यामुळे मागील वर्षाचा कापूस अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यातच मान्सून तोंडावर येऊन ठेपला असून शेतीच्या मशागतीसाठी तसेच खते, बी- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची अडचण भासत आहे. त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्री महोदयांनी याकडे त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांची समस्या सोडवावी, अशी मागणी यानिमित्त केली जात आहे.
निवेदन देताना डॉ. प्रशांत पाटील, सुभाष ठोंबरे, दीपक कदम, राजेंद्र तिडके, गुरुदास कन्हेरकर, गजेंद्र कदम, किसन थोरात, मुकुंदा सुरवाडे, रामचंद्र भोमटे, विठ्ठल दारकुंडे, सुकलाल धनगर, रहमान शाह फकीर, सुभाष धनगर, पंडित सुरासे, भास्कर धनगर, शिवराम आखाडे, चंद्रकांत मोरे, शामकांत मोरे, राजेंद्र लंके, प्रभाकर काळे, जनार्दन सुरवाडे, ताराचंद खडके, पद्माकर नरवाडे, अशोक ढगे, गोपाल बेदरे, गजानन खराटे, आत्माराम वाघ, संभाजी दांडगे, दत्ता परदेशी, कमलाकर नरवाडे आदींसह तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून एप्रिल २०२४ अखेर तालुक्यातील एकूण ३४ हजार ९५९ विमाधारकांना नुकसान भरपाई मिळेल, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. तर मार्च महिन्यापासून या संदर्भात शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. तर आजपर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ८ दिवसाच्या आत पिक विमाधारकांना रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.