अमळनेर तालुक्यातील जानवे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : – तालुक्यातील जानवे येथे एका तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक कयास नातेवाईकांनी व्यक्त केला.
रविंद्र मल्हारी पाटील (वय ३५, रा. जानवे) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात आई, वडील, पत्नी, १ मुलगी यांच्यासह तो राहत होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याने दि. २१ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात लाकडी सऱ्याला सुती रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रविंद्रला खाली उतरवले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
शरद साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. दरम्यान, त्याच्यावर शेतीकामामुळे कर्ज घेतलेले असल्याने व यंदा शेतात उत्पन्न देखील निघत नसल्यामुळे तो तणावात होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळेच त्याने आयुष्य संपविले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.