चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अडावद येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवल ताराचंद महाजन (५४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नवल महाजन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.(केसीएन) नवल महाजन हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीसाठी त्यांनी अडावद विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. यावर्षी त्यांनी मक्याची लागवड केली होती, परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक शेतातच सडले. पुढे त्यांनी उसनवारी करून रब्बी हंगामासाठी कांदा लागवड केली. मात्र, कांद्याच्या गडगडलेल्या किमतींमुळे त्यांचे सोसायटीचे कर्ज आणि इतर उसनवारीचे पैसे फेडणे शक्य होणार नाही, याची जाणीव झाल्याने ते मानसिक तणावात होते.
पुढील हंगाम आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसा कुठून आणायचा, या विवंचनेत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. २६ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.