जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील रहिवासी असलेल्या व कर्जबाजारपणातून नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि. ३ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर तुकाराम बारी (खलसे, वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. दुपारी त्यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन पंचनामा करून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे शिरसोली गावात शोककळा पसरली आहे.