पाचोरा तालुक्यातील भोजे येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भोजे येथे शेतमजुरी करणाऱ्या व्यक्तीने घरातच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ३० जून रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जीवन भरतगिर गोसावी (वय ४५, रा. भोजे ता. पाचोरा) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ४ विवाहित मुली असा परिवार आहे. शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह ते करीत होते.(केसीएन) रविवारी दि. २९ रोजी रात्री कुटुंब झोपले. पहाटे पत्नी नेहमीच्या कामाप्रमाणे शेतीच्या कामानिमित्त घरातून बाहेर गेल्या. घरात पती आणि मुलगा दोघेच होते. सकाळी ८ वाजेनंतर जीवन गोसावी याने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने मुलाने घरात पाहिले तर वडिलांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.
त्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे भोजे गावात शोककळा पसरली आहे.