यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारामध्ये शेतात काम करत असताना एका ५० वर्षीय शेतकरी महिलेवर रानडुकराने हल्ला केला. महिलेच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली आणि चेहर्यावर देखील रान डुकराने चावा घेतला आहे. ही घटना बुधवार दि. २२ मे रोजी दुपारी घडली. महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
डोंगरकठोरा शेत-शिवारात रेखाबाई नीळकंठ चौधरी (वय ५०, रा. डोंगरकठोरा) ही महिला बुधवारी दि. २२ रोजी शेतात काम करत होत्या. अचानक या महिलेवर रानडुकराने हल्ला चढवला आणि या हल्ल्यात महिलेचा उजव्या पायाला जबर दुखापत केली. महिलेच्या चेहर्यावरदेखील रानडुकराने चावा घेतला. महिलांनी आरडा-ओरड केल्याने शेतमजुरांनी धाव घेतली आणि महिलेला रानडुकराच्या तावडीतून सोडवले. तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे प्रथमोपचार केले. त्यांच्या पायाला जबर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.