अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील घटना


अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पातोंडा येथे गरीब कुटुंबातील तरुण शेतकऱ्याचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दिनांक १४ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ईश्वर हिरामण बिरारी (४७) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बहीण असा परिवार आहे. ईश्वर बिरारी हा शेतात शेत वखरणीसाठी गेला होता. शेतात असलेल्या झाडाची फांदी वखरनीच्या बैल औतास नडत होती. ती फांदी तोडण्यासाठी ईश्वर बिरारी झाडावर चढत असताना त्याचा पाय घसरून खाली पडल्याने बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेतच त्याला उपचारासाठी चोपडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. नातेवाईक शिवदास पाटील यांनी चोपडा पोलिस स्टेशनला खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे पातोंडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









