अमळनेर तालुक्यातील दहिवद शिवारातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दहिवद येथे शेतीच्या हिश्यावरून दोन गटात हाणामारी होऊन तीन जखमी झाल्याची घटना दि. १३ जून रोजी सकाळी तालुक्यातील दहिवद शिवारात घडली आहे. दोन्ही गटाच्या एकूण ९ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमलबाई रमेश पाटील या दि. १३ रोजी सकाळी साडे दहा वाजता कुटुंबियांसोबत दहिवद शिवारातील गट नंबर ४६० मध्ये शेती काम करत असताना निताबाई जितेंद्र पाटील जवळ आली आणि शिवीगाळ करू लागली. ही शेती आमची आहे तुम्ही का करता म्हणून दमबाजी करू लागली. तेव्हा जितेंद्र सुभाष पाटील आला आणि त्याने हातातील लोखंडी सळईने डोक्यात मारले. त्यावेळी मुलगा अधिकार पाटील,सून कविता पाटील आणि मुलगी अनिता पाटील भांडण आवरायला आले असता त्यांनाही जितेंद्र पाटील आणि त्याचा मुलगा मयूर पाटील यांनी चापट बुक्क्यांनी मारले. दवाखान्यात उपचार केल्यानंतर विमलबाईने फिर्याद दिल्याव रून जितेंद्र पाटील,निताबाई पाटील, मयूर पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दुसऱ्या गटातर्फे नीता जितेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली की, १३ रोजी ती शेतात काम करीत असताना आमचे भाऊबंद अधिकार रमेश पाटील, विमलबाई रमेश पाटील, कविता अधिकार पाटील, मयूर अधिकार पाटील सर्व रा.दहिवद तसेच अनिता विनोद पाटील व विनोद प्रकाश पाटील (रा कापडणे ता धुळे) हे हातात लाठ्या काठ्या घेऊन आले व शेती आमची आहे तुम्ही करायची नाही असे सांगत शिवीगाळ करू लागले. त्यांना शिवीगाळ करू नका म्हणून सांगितले असता विमलबाई, अनिता, कविता यांनी तिच्या डोक्यावर,हातावर काठ्यांनी मारहाण केली. भांडण आवरण्यासाठी माझे पती, मुलगा आले असता त्यांना मयूर अधिकार पाटील, अधिकार पाटील व विनोद पाटील यांनी काठ्यांनी पाठीवर, हातावर, पायावर मारहाण केली. आणि पुन्हा शेतात पाय ठेवला तर जीवानिशी मारून टाकू अशी धमकी दिली. दवाखान्यात उपचार घेऊन आल्यावर विमलबाई, अधिकार, कविता, अनिता,मयूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेकॉ सुनील जाधव करीत आहेत.