रावेर तालुक्यातील दोधे गावची घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने शेत परिसरात राहणारे पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन याबाबत माहिती घेत आहे.
रावेर तालुक्यातील दोधे गावात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी वीज कोसळल्याने गावात राहणारे मीराबाई प्रताप जमरे (वय ३०), पूजा प्रताप जमरे (वय १३), रेखाबाई खरते (वय ३०), कालू खरते (वय ३०) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय ३०) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून, उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते. शेतात राहुट्या उभारून ते राहत होते.
प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.