जळगावच्या छत्रपती शिवाजी नगरातील घटना : कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह
जळगाव (प्रतिनिधी) : घरासमोर बांधलेल्या शेळ्या कारमध्ये टाकून चोरून नेणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे शेळीमालक जमील युसूफ शेख (वय ४७, रा. शिवाजीनगर) यांना चोरट्यांनी कारसोबत फरपटत नेले. कारमधील चोरट्याची मान त्यांनी पकडून ठेवल्याने त्यांच्या हातावर लोखंडी शस्त्राने वारदेखील करण्यात आले. ही धक्कादायक घटना रविवारी दिनांक ४ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जमील युसूफ शेख यांचा शेळीपालनासह खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी घरासमोर बांधलेल्या शेळ्यांपैकी एक शेळी काहीजण कारमध्ये टाकून दुसरी शेळीही नेत असल्याचे दिसले.(केसीएन) त्यावेळी शेख यांनी चालकाच्या बाजूच्या मागील सीटवर बसलेल्याची मान पकडून त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्या हातावर लोखंडी शस्त्राने वार केला. तसेच चालकाने गाडी सुरु करीत शेख यांना काही अंतरापर्यंत फरपटत नेले.
अखेर चोरटे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिशेने दोन बकऱ्या चोरून पसार झाले. शेख यांच्या मित्रांनी नशिराबाद पर्यंत कारचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.