एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे जळगाव एसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : इन्स्पेक्शन अहवालामध्ये चांगला शेरा लिहावा याकरिता शिक्षकांकडून हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याचबरोबर शिक्षण विस्तार अधिकार्यावरदेखील शाळेकडे १० हजार रुपये मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठे येथील प्राथमिक शाळेचे इन्स्पेक्शन संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांनी केले होते.(केसीएन) इन्स्पेक्शन अहवालामध्ये चांगला शेरा लिहावा म्हणून त्यांनी शाळेकडे १० हजार रुपये मागितले होते. त्यावरून दुसरे संशयित आरोपी मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे (वय ५५) यांनी प्रत्येकी १ हजार रुपये शिक्षकांकडून मागितले होते. मात्र त्यात तक्रारदार ३७ वर्षीय तक्रारदार शिक्षकासह आणखी एका शिक्षकांनी पैसे देण्यास मात्र नकार दिला होता.
त्यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार सोमवार दि. २० जानेवारी रोजी मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना तक्रारदारांकडून १ हजार रुपये लाच रक्कम घेताना मुख्याध्यापक कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. (केसीएन)तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची पथकाने फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही. नंतर फोन करतो असे सांगितल्यामुळे त्यांच्यावरही एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई ही पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांनी केली आहे.