शाहूनगरमध्ये व्यक्तीच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची चोरी
शाहू कॉम्प्लेक्ससमोर घडली घटना; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल


जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात शाहू कॉम्प्लेक्ससमोर एका व्यक्तीच्या खिशातून तब्बल १२ हजार ५०० रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्ससमोर ही चोरी झाली. अनिल राजमल कासट (वय ६२, व्यवसाय मॅनेजर, महेश प्रगती मंडळ, रा. एमआयडीसी म्हाडा कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील विविध दराच्या नोटांसह एकूण १२ हजार ५०० रुपये लंपास केले. यामध्ये ५०० रुपयांच्या १० नोटा म्हणजे ५ हजार रुपये, १०० रुपयांच्या ४० नोटा म्हणजे ४ हजार रुपये, ५० रुपयांच्या ४० नोटा म्हणजे २ हजार रुपये, २० रुपयांच्या ६० नोटा म्हणजे १ हजार २०० रुपये आणि १० रुपयांच्या ३० नोटा म्हणजे ३०० रुपये असा चोरी गेलेल्या रकमेचा समावेश आहे.
या प्रकरणी सईद खान नजीर खान पठाण (वय २७, रा. गेंडालाल मिल, जळगाव) आणि समीर खान मशीद खान (वय ३५, रा. गेंडालाल मिल, जळगाव) यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/२६११ सतीश पाटील करीत असून, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू आहे.









