पू. डॉ. उदितप्रभाजी ‘उषा’ म.सा. यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) :- जैन आगममध्ये ‘तप’, ‘नामस्मरण’ आणि ‘दान’ याही पेक्षा ‘सेवा’ भावनेस अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे. उत्तराध्यायनसूत्र मध्ये देखील सेवेची महती वाचावयास मिळते. सेवा करून आपले जीवन सत्यम, शिवम् आणि सुंदरम् बनवा असा आत्मचिंतनाचा विषय आजच्या धर्मप्रवचन सभेत मांडण्यात आला. ‘सेवा दिवसा’च्या औचित्याने प.पू. डॉ. उदितप्रभाजी ‘उषा’ म.सा. यांनी श्रावक व श्राविकांना उद्देशून मोलाचा संदेश दिला. सेवा करताना फक्त मानवाचाच नव्हे तर प्राणी मात्रांवर भूतदया दाखवून त्यांची सेवा करणे देखील लाभदायी ठरते, त्यांचीही मनोभावे सेवा करावी असे समजावून सांगताना सेवाभाव जपला, सेवा केली तर कोणते फायदे होतात ही बाब स्पष्ट करताना वाराणसीच्या विश्वनाथ मंदिर परिसरात घडलेली एक गोष्ट देखील प्रस्तूत केली.
फार पूर्वी काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात अवकाशातून एक दिव्य सुवर्ण थाळी जमिनीवर आली. त्या समवेत आकाशवाणी झाली की, ‘जी व्यक्ती सेवा करते त्या व्यक्तीला ही सुवर्णथाळी प्राप्त होईल.’ ही थाळी प्राप्त करण्यासाठी मंदिराचे महान पुजारी, तपस्वी, साधक, दानी, सन्यासी इतकेच नव्हे तर मंदिराच्या निर्माण कार्यात ज्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला होता अशा महनीय व्यक्तींनी आपले नशीब आजमावून पाहिले परंतु ती थाळी कुणालाही मिळाली नाही. एक शेतकरी पुढे आला. ती दिव्य सुवर्ण थाळी त्याची झाली. सर्व त्या शेतकऱ्याला विचारतात की, तू काय सेवा केली. त्या शेतकऱ्याने कुष्ठरोग्याची निरपेक्ष भावनेने सेवा केली. शेतकऱ्याच्या सेवा करण्यात कोणताही स्वार्थ नव्हता. निःस्वार्थपणे सेवा करत रहावी. मनुष्याने परस्पर सहयोगिता आणि सेवाभाव नेहमी हृदयात असू द्यावा.
ह्याच विषयी स्पष्ट करताना प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी देखील भाष्य केले. कायिक, मानसिक आणि आत्मीक अशा तीन प्रकारच्या सेवा ‘जैन दर्शन’मध्ये सांगितलेल्या आहेत. ज्यांच्यांत ‘विनय’, ‘धैर्य’ हे गुण असतात तेच सेवा करू शकतात असे सांगण्यात आले. अंतेवासिनी राजगुरुमाता, काश्मीर प्रचातिका प.पूप, श्री उमरावकुँवरजी म.सा. अर्चना जन्मोत्सवा निमित्त पंचम दिवशी ‘सेवा दिवसा’च्या निमित्ताने त्यांच्या सेवाभावीवृत्तीला व स्मृतिंना उजाळा देण्यात आला. परदुःखाने त्या व्यथित होत असत असे नमूद करण्यात आले.