शासकीय कामकाजावर होऊ शकतो परिणाम
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यातील सरपंच, ग्रामसेवकांसह सर्व कर्मचारी सोमवारपासून दि. १८ तीन दिवस काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतीसंदर्भात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल.
राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार, संगणक ऑपरेटर व कर्मचारी यांच्या विविध मांगण्यासाठी १८ ते २० डिसेंबर अशा तीन दिवस राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर, ग्रामरोजगार मिळून ८४ हजार व सुमारे एक लाख कर्मचारी न्याय हक्कासाठी ‘काम बंद’ आंदोलन करतील. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमार्फत चालणारे संपूर्ण कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत कामकाज बंद आंदोलनात अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक या संघटनांचा समावेश आहे.
सरपंच, उपसरपंच यांचे मानधन थकीत बाकी अदा करावी, शंभर टक्के मानधन शासनाने द्यावे, ग्रामपंचायत सदस्यांचा थकीत बैठक भत्ता वाढीव अनुदानासह अदा करावा, विमा संरक्षण द्यावे, विधान परिषदेच्या निवङणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत, मुंबईत सरपंच भवन उभारावे, ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावे आदी मागण्या आहेत.