जळगाव (प्रतिनिधी) – साप आणि मुंगसाचा रस्त्यावरचा थरार तुफान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . आपण बघितले आहे नैसर्गिक अधिवासात विविध प्राण्यांचे एकमेकांशी असलेले वैर . उंदीर आणि मांजरासारखे साप आणि मुंगसाच्या जोडीचे असेच वैर सर्वज्ञात आहे. सध्या सोशल मीडियावर असाच साप आणि मुंगसाच्या झटापटीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अकोला जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.


एका निर्मनुष्य रस्त्यावर पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात निवांत बसलेला जातिवंत नाग जणू सावज टिपण्यासाठी टपून बसलेले असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे. अचानक रस्त्याच्या दुसऱ्या कडेने आलेला मुंगूस चोर पावलांनी या नागाजवळ आला आहे. चौफेर नजर फिरवत असलेल्या नागाला लगेच मुंगूसाची चाहूल लागते ते दोघे एकमेकांना लगोलग आव्हान देतात. आणि सुरु होतो त्यांचा संघर्ष ! पाण्याच्या डबक्याच्या चारही बाजूंनी फिरून विजेच्या चपळाईने तो मूंगूस नागावर हल्ला चढवण्यासाठी सोयीची जागा शोधत आक्रमणाची तयारी करतो त्यावेळेत नागसुद्धा जिवाच्या निकराने मुंगूसाच्या चालीचा प्रतिकार करताना दिसतो आहे. अखेरीस थकून गेलेल्या नागाला एका बेसावध क्षणी मुंगूस चारी मुंड्या चित करणारी अखेरची निर्णायक चाल करतो आणि नागाचा प्रतिकार संपतो असे या उत्कंठावर्धक व्हिडिओमध्ये दिसते .








