नागपूर शालार्थ प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी, सीईओ यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – नागपूर विभागातील कथित बोगस शालार्थ प्रकरणाच्या निषेधार्थ आणि अटक केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ जळगाव शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.
या प्रकरणात कोणत्याही चौकशीविनाच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अपमानास्पद कारवाई झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या निषेधार्थ कल्पना चव्हाण (शिक्षणाधिकारी, माध्यमिक), स्वाती हवेली (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक), रियाज तडवी (अधीक्षक, शिक्षण विभाग), अजित तडवी (अधीक्षक, पंचायत समिती जळगाव) आणि सचिन मगर (अधीक्षक, पंचायत समिती यावल) यांनी एक दिवसाची रजा घेतली. या आंदोलनाला शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. निवेदन देताना शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे फिरोज पठाण ,नरेंद्र चौधरी, एजाज शेख, प्रतिमा सानप, रागिणी चव्हाण, खलील शेख आणि विजय पवार उपस्थित होते.