चाळीसगाव तालुक्यातील डोणदिगर शिवारातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरावर गोळीबार करून पोलिसांना खोटी माहिती देत कट रचल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्याच्या शोधार्थ पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
रघुनाथ वामन गोसावी (रा. डोणदिगर, ता. चाळीसगाव) यांनी कैलास रघूनाथ पाटील याच्याविरुध्द त्यांच्या मुलीचे अपहरण केलेबाबत गुन्हा दाखल केला होता. याचा बदला घेण्यासाठी व रघुनाथ गोसावी यांना फसविण्यासाठी कट कारस्थान रचून कैलास रघुनाथ पाटील आणि गणेश पाटील यांनी उमरटी, मध्यप्रदेश येथून एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन गोळ्या २० हजाराला विकत घेतले. त्यानंतर कैलासने त्याचा त्याचा मेहुणा गणेश पाटील याच्याकडून स्वतः राहत असलेल्या डोणदिगर शिवारातील शिंपी यांच्या मळ्यातील घरावर दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दरम्यान गावठी कट्ट्याने दोन गोळ्या फायर करवून घेतल्या.
तसेच सदरचा फायर रघुनाथ गोसावी याने केला, अशी खोटी माहिती डायल ११२ वर पोलीसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून घटनेचा सविस्तर अभ्यास केला. यात कैलास पाटील व गणेश पाटील या साले-पाहुण्यांचा बनावट खेळ उघड झाला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कैलास रघुनाथ पाटील याला अटक केली असून गणेश याच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहेत.